नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठा आठ दिवस बंद राहणार
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावं अशी मागणी नागरिक करत होते. मात्र यापुढे प्रशासनाकडून कुठलाही लॉकडाऊन लागणार नाही असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता व्यापाऱ्यांनीच स्वयंस्फुर्तीने लॉकडाऊन पाळायचं ठरवलं आहे. जेणेकरून गर्दीला आणि कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा बसेल अशी आशा सगळ्यांनाच आहे.
गेल्या काही दिवसात नाशिक शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या वाढली आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी नाशिक शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा अशी मागणी नागरिक करत आहेत. मात्र प्रशासनाकडून याला प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांची निराशाच झाली. अर्थचक्र सुरु राहण्यासाठी आता लॉकडाऊन करणे योग्य ठरणार नाही त्यापेक्षा नागरिकांनी काळजी घ्यावी, नियम पाळावेत अशी प्रशासनाची भूमिका आहे. मात्र दुसरीकडे बाजारपेठांमधील गर्दीसुद्धा दिवसेंदिवस वाढतच आहे आणि कोरोनाबाधीतांची संख्या सुद्धा. अशावेळी मुख्य बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या मेनरोड आणि परिसरातील व्यापाऱ्यांनी जबाबदारीने आणि स्वयंस्फुर्तीने महत्वाचा निर्णय घेतला; तो म्हणजे स्वत:हून येते आठ दिवस मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्याचा ! जे प्रशासनाला नाही जमलं ते नाशिककरांनी करून दाखवलं.
व्यापाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयानुसार येत्या २८ जून २०२० पर्यंत मेन रोड, रविवार पेठ, चांदवडकर लेन, एमजी रोड, भद्रकाली, कानडे मारुती लेन, दहीपूल, बोहोरपट्टी, अशोक स्तंभ ही बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे.