नाशिक (प्रतिनिधी): जिल्हयातील मालेगाव शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट असुन शहरात बंदोबस्त दरम्यान कर्तव्य बजावत असतांना पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना आजारावर उपचार करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना तात्काळ नाशिक येथील विविध रूग्णलयांमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचाराअंती तब्बल 175 कोरोना बाधीत पोलीसांनी कोरोना आजारावर यशस्वीरित्या मात केलेली आहे.
कोरोनामुक्त झालेल्या पोलीस योध्दयांमध्ये नाशिक ग्रामिण पोलीस दलाचे 90 पोलीस, जालना एस.आर.पी.एफ.चे 39 पोलीस, औरंगाबाद एस.आर.पी.एफ. चे 10, अमरावती एस.आर.पी.एफ.चे 13, धुळे एस.आर.पी.एफ 2, मरोळ आणि धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे 2, जळगाव पोलीस दलातील 4 आणि मुंबई रेल्वे पोलीस 15 असे एकुण 175 पोलीसांनी कोव्हीड 19 कोरोना आजारावर मात करून उपचाराअंती बरे झालेले आहेत.
सद्यस्थितीत एकुण 06 कोरोनाबाधीत पोलीस कर्मचारी रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहे. नाषिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी कोरोना मुक्त झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचे अभिनंदन केलेले आहे व त्यांना त्यांचे सहकारी तसेच नातेवाईक यांचेकडुन देखील शुभेच्छा येत आहेत. मालेगावात कर्तव्यावर असतांना कोरोनाची लागण झालेले एकुण 175 पोलीस कर्मचा-यांनी कोरोनावर यषस्वीरित्या मात केलेली असुन उपचाराअंती पुर्णतः बरे झालेले बहुतांश पोलीस पुन्हा नव्या जोमाने कर्तव्यावर हजर देखील झालेले आहेत. त्यामुळे पोलीस दलात समाधानाचे वातावरण असुन कोरोना योध्दयांसह त्यांचे इतर पोलीस सहका-यांचेही मनोबल वाढले आहे.