नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला २ ते ३ जून या कालावधीत चक्रीवादळ धडकणार अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली. या चक्रीवादळाचा धो’का लक्षात घेता एनडीआरएफ च्या १६ तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. इंडीयन मेट्रोलॉजिकल डीपार्टमेंट कडून धुळे, नंदुरबार, रायगड, पुणे, ठाणे, पालघर या जिल्ह्यांसोबतच नाशिकलासुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता स्कायमेट ने वर्तवली आहे. याआधी येत्या ४ तारखेला सतर्कतेचा ईशारा देण्यात आला होता, परंतु आता ३ तारखेलाच हे वादळ उत्तर महाराष्ट्राला आदळणार असल्याचे संकेत आयएमडी कडून देण्यात आले आहेत. याबाबतचा नकाशाही त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्यात नाशिक जिल्ह्याला लाल रंगात दाखविण्यात आले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या पार्श्वभूमीवर ३ व ४ जून रोजी येणाऱ्या या अतितीव्र वादळामुळे तसेच मुसळधार पावसामुळे महावितरण कंपनीच्या मालमत्तेला हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या चक्रीवादळ दरम्यान विजेचे खांब आणि वीजवाहिन्या कोसळण्याची शक्यता आहे. म्हणून यादरम्यान दीर्घ कालावधीसाठी वीजपुरवठा बंद असण्याचीही शक्यता आहे.