कुत्र्यांच्या भांडणात चुलीवर ठेवलेले गरम पाणी सांडल्याने दोन चिमुकल्या भाजल्या
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक तालुक्यात कुत्र्याच्या झटापटीत दोन चिमुकल्या भाजल्या गेल्याची घटना घडली आहे.
गिरणारे गावापासून काही अंतरावर असलेल्या देवरगाव येथे ही घटना घडली आहे.
गुरुवारी 7 मार्च रोजी सकाळी सहा वाजता ही घटना घडली आहे.
रुपाली कराटे आणि पल्लवी कराटे अशी दोघींची नावं असून दोघींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, धनाबाई कराटे यांच्या पतीचे दोन वर्षापूर्वी निधन झाले आहे. यानंतर धनाबाई ह्या दरेगाव येथे त्यांच्या भावासोबत एका छोट्या घरात वास्तव्यास आहे. त्यांच्या सोबत त्यांच्या दोन मुली रुपाली वय 3 वर्ष आणि पल्लवी वय 4 वर्ष ह्या सुद्धा राहतात. घरातच चुलीवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. घर छोटं असल्याने चुलीजवळ रुपाली, पल्लवी आणि त्यांची आई झोपली होती. सकाळी अंघोळीसाठी चुलीवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. मात्र काही वेळात घरातील पाळीव कुत्रा आणि बाहेरील कुत्रा यांच्यात झटपट झाली. त्यात चुलीवर ठेवलेले गरम पाणी खाली पडले.
हे पाणी जवळच झोपलेल्या रुपाली आणि पल्लवी यांच्या अंगाखाली गेले. यात रुपाली आणि तिची मोठी बहीण पल्लवी भाजल्या गेल्या. यात रुपाली 60 ते 70 टक्के भाजली गेली आहे तर पल्लवी किरकोळ भाजली आहे.