नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेकडून या वर्षीदेखील पुष्पोत्सव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ते ११ फेब्रुवारी या तीन दिवसाच्या दरम्यान नाशिककरांना फुलांचे विविध प्रकार पाहायला मिळणार आहे.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी माहिती दिली.
पुष्पोत्सव प्रदर्शनाच्या निमित्ताने विविध गटात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. त्यासाठी १७९७ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. त्याशिवाय पुष्पोत्सवात ४२ नर्सरीचे स्टॉल व वीस फूड स्टॉल आहेत. महापालिका मुख्यालय व आवारात पुष्पोत्सव प्रदर्शन होईल. प्रवेशद्वारावर फुलांची आकर्षक कमान उभारण्यात आली आहे.
प्रांगणात सेल्फी पॉइंट, तर मिनोचर लँडस्केपिंग तसेच महापालिका मुख्यालयाच्या तीनही मजल्यावर विविध प्रकारची गुलाबपुष्पे, मौसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके पुष्परचना, बोन्साय, कॅक्टस, शोभिवंत कुंड्या ठेवल्या जाणार आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सायंकाळी चार वाजता उद्घाटन होईल.
प्रदर्शन सर्वांसाठी मोफत राहील. सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत प्रदर्शनाचा लाभ घेता येईल. ९ फेब्रुवारीला उद्घाटनाच्या दिवशी अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर उपस्थिती राहील. १० फेब्रुवारीला सकाळ सत्रात निसर्ग व फुलांवर आधारित कविता सत्र व सायंकाळी संगीतसंध्या होईल. ११ फेब्रुवारीला संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
याच दिवशी विजेत्यांना ट्रॉफीचे वितरण अभिनेता किरण गायकवाड व अभिनेत्री शिवानी बावकर यांच्या हस्ते होईल. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी ९ फेब्रुवारीला सकाळी साडेसहा वाजता गणेशवाडी फूल बाजार येथून सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे.
पुष्पोत्सव स्पर्धेव्यतिरिक्त नागरिकांकडून निसर्गावर आधारित पेंटिंग फुलांची माहिती देणारे छायाचित्र तसेच शिल्पकला व काव्यात्मक रचनेच्या माध्यमातून स्त्रियांच्या आयुष्यातील सामाजिक व भावनिक विषय मांडणारी कलाकृती ठेवली जाणार आहे. ग्रामीण संस्कृती व मधमाशी यांचे महत्त्व दर्शविणारा देखावा पुष्पोत्सवात आहे.
१७९७ प्रवेशिका:
गुलाब पुष्पे (खुला गट) या प्रकारात ४४६ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. त्याचबरोबर कृत्रिम आच्छादनाखालील गुलाबपुष्पे गटात २३०, तर गुलाबपुष्पे खुला गटात ८३ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. मोसमी बहुवर्षीय फुलांच्या गटात ५२१, तर कुंडीतील शोभा व वनस्पती घाटात २६२ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत.
११४ पुष्परचना व ४३ प्रवेशिका फळे व भाजीपाला गटात, तर ९८ प्रवेशिका कुंड्यांची सजावट व परिसर प्रतिकृती प्रकारात प्राप्त झाल्या आहेत. अशा एकूण १७९७ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. पुष्पोत्सवात पहिल्या मजल्यावर गुलाब पुष्परचना व शुष्क काष्ठ तर दुसऱ्या मजल्यावर मोसमी बहुवर्षीय, बोन्साय, कॅक्टस फुले ठेवली जाणार आहे. तिसऱ्या मजल्यावर फळे व भाजीपाला तबक उद्यान व पुष्प रांगोळी असे प्रकार पाहायला मिळतील.