नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घशाचा संसर्ग यामुळे सर्वच वयोगटातील रुग्णांची संख्या वाढली आहे.
पालिकेसह खासगी रुग्णालयांत व्हायरल इन्फेक्शनचे रोजच्या ओपीडीत ४०० ते ५०० रुग्ण दाखल होत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. सिव्हिलच्या ओपीडीत ३५०, तर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या बालरुग्ण ओपीडीत रुग्णसंख्या २०० पर्यंत पोहोचली आहे.
सध्या थंडी आणि ऊन असा ऋतूसंधीकाळ असल्याने संसर्गजन्य आजारांत वाढ झाली आहे. यात जंतूसंसर्गातून न्यूमोनिया आजाराचा धोका बळावला आहे. त्यातच सर्दी आणि खोकला या दोन्ही तक्रारींमुळे कफ होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, तापाच्या रुग्णांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. कधी थंडी तर कधी कोरड्या वातावरणामुळे सध्या विविध आजारांनी डोके वर काढले आहे.
घरोघरी सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांसोबतच खासगी दवाखान्यांतही गर्दी होत आहे. श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींना वातावरणाचा बदलाचा सर्वाधिक त्रास होत असतो. त्यामुळे अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर व्हायरल इन्फेक्शनचाही अनेकांना त्रास जाणवत आहे.