नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरी ते कसारादरम्यान वाहनांना अडवून लूटमार करणाऱ्या दोघांना कसारा पोलिसांनी गुरुवारी (ता. ९)पहाटे मोठ्या शिताफीने अटक केली.
कसारा घाटातील नवीन व जुन्या घाटात गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाहनांना अडवून किंवा बंद पडलेल्या वाहनधारकांना, तसेच रात्री वाहनांवर दगडफेक करून वाहन थांबवून चाकू व पिस्तूलचा धाक दाखवून चालकांकडून पैसे व सामान चोरी करून पसार होत होते.
गुरुवारी पहाटे जुन्या कसारा घाटात एक वाहन बंद पडले होते. याचाच फायदा घेत संशयितांनी चाकू व पिस्तूलचा धाक दाखवत पैसे व सामान घेऊन चोरटे पसार झाले. चालकाने अंधाराचा फायदा घेत तेथून पळून जात कसारा पोलिस चौकी गाठली व घडलेली हकीगत सांगितली.
त्यावरून कसारा पोलिसांचे पथक तत्काळ जुन्या कसारा घाटात दाखल झाले. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. नवीन कसारा घाटात वाहनांनावर दगडफेक करून वाहनांना अडविण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती पुन्हा पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी आपला मोर्चा नवीन कसारा घाटात वळवला. दोन चोरटे कोकणी ढाब्यावर पार्टीसाठी बसले आहे, अशी माहिती पहाटे चारला पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी कोकणी ढाब्यावर छापा टाकून रोहन सुनील सोनवणे (रा. तळेगाव, ता. इगतपुरी) व महेश लहानू बिन्नर (रा. लतीफवाडी, शहापूर) यांना अटक केली.
त्यांच्याजवळून पिस्तूल, चॉपर व दुचाकी ताब्यात घेतली व संशयितांना कसारा पोलिस ठाण्यात आणले. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, कसारा घाटात वाहनधारकांना लूटणाऱ्या अनेक टोळ्या आहेत. या दोन संशयितांना अटक केल्यामुळे आणखी गुन्हे उघडकीस येतील, अशी माहिती कसारा पोलिसांनी दिली. ही कारवाई महामार्ग पोलिस व कसाऱ्याचे ठाणे अंमलदार काटकर, हवालदार सुनील खताळ, किरण आहेर, सचिन बेंडकुळे यांनी केली.