भाग्यश्री गिलडा, महाराष्ट्र एक्स्प्रेस ग्रुप
कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यानंतर आता अनलॉक टप्पा सुरु झालाय. यामध्ये उद्योगधंदे तसेच इतर व्यवसायांना परवानगी देण्यात आली म्हणून नागरिकांना दिलासा मिळाला मात्र दुसरीकडे अनलॉक टप्प्यात गुन्ह्यांच्या प्रमाणामध्येसुद्धा कमालीची वाढ होत आहे त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
शहरात नागरिकांची वर्दळ वाढली असून बाजारपेठही गजबजल्या आहेत. याचाच फायदा घेऊन सध्या शहरात चोरटे सुद्धा सक्रीय झाले आहेत. हे चोरटे रात्रीच नव्हे तर भर दिवसासुद्धा मोबाईल किवा सोन्याचे दागिने ओरबाडून नेत असल्याचे चित्र आहे. या प्रकारात नागरिकांना गंभीर दुखापती होत असल्याचे सुद्धा समोर येतेय. तसेच मोटारसायकल किंवा वाहन चोरी, घरफोडी हे प्रकार सुद्धा वाढल्याचे दिसतेय. त्यामुळे या गुन्हेगारांना पोलिसांचा दरारा राहिलेला नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये होतांना दिसतेय. त्यानंतर विनयभंग, बलात्कार, अपहरण यासारख्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा सातत्याने वाढ होत असल्यामुळे शहरातील महिला वर्गामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
त्याचबरोबर शहरात अवैध धंदे सुद्धा सुरु असल्याची माहिती आहे म्हणून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाहीये? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. नवीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी डीबीमध्ये नवीन कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे कलेक्शन वर भर देणाऱ्या डीबीच्या कर्मचाऱ्यांकडून आता कामगिरीवर भर दिली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.