नाशिक (प्रतिनिधी): लॉकडाऊन काळात सर्वच अवैधधंदे व दारू दुकाने बंद असल्याने शहरातील अट्टल गुन्हेगार घरातच तळ ठोकून बसले होते. रस्त्यावर गल्लीबोळात चौक चौकात पोलीस बंदोबस्तावर असल्याने आणि वेळोवेळी गस्त असल्याने पोलिसांचं धाक बाळगून अनेक गुन्हेगार घरातच तळ ठोकून बसले होते.
मात्र लॉक डाऊन मध्ये शिथिलता मिळाल्यानंतर पोलिस बंदोबस्त देखील कमी झाला आणि नाशिक शहरातील सराईत गुन्हेगारांनी हळू हळू डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. शहरात सोनसाखळी चोरी, घरफोडी, मारहाण, मद्यपींचा हौदोस, टोळक्याकडून मारहाण असे अनेक लहान मोठे गुन्हे रोजच घडत असल्याने सामान्य नागरिकांना मध्ये कोरोना व्हायरस प्रमाणे भीती पसरली आहे. एवढेच नाही तर पोलीस कर्मचाऱ्यां देखील मारहाण करण्याएवढी या गुन्हेगारांची मजल गेली आहे.. कोणार्क नगरमधील गणेश मार्केट जवळ गस्त घालणाऱ्या बिट मार्शल (प्रफुल्ल वाघमारे) यांना एका बिल्डिंगजवळ दोन संशयित (आकाश गोविंद राठोड व तुषार रवींद्र सावंत) हे आढळून आल्याने त्यांना विचारपूस केली असता त्या दोघा संशयितांनी गस्तीवरील बिट मार्शल वाघमारे यांना मारहाण केली. जर पोलिसांवरच गुन्हेगार हात उचलत असतील तर सर्व सामान्य नागरिकांचे कसे होणार असा प्रश्न सर्व सामान्यांमध्ये उपस्थित होत आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांना गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे.