नाशिक (प्रतिनिधी): ऑक्टोबरचा महिना सुरू असल्यामुळे वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे.त्यातच वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे शहरात अघोषित भारनियमन सुरू आहे. म्हणून ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील काही नागरिकांनी महावितरणाच्या अधिकार्यांशी याबाबत संपर्क साधला.परंतु, त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नाही.म्हणून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला काही नागरिकांनी यासंदर्भात फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियावर महावितरणाच्या कार्यप्रणालीविषयी रोष व्यक्त केला आहे. महावितरणचे अधिकारी झोपले आहेत की काय ? असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित करण्यात येत आहे.तसेच महावितरणची खिल्लीही उडवली जात आहे. कॉलेजरोड, गंगापूररोड, शरणपुररोड,सातपूर, नाशिकरोड या परिसरात काही दिवसांपासून दुपारी व रात्री दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतराने वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे घरी काम करणाऱ्या तसेच मोबाईलवर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मानसिक त्रास होत आहे.
तर दुसऱ्या बाजूला तांत्रिक समस्या निवारणासाठी देखील मोठ्या प्रमाणावर वेळ लागतो.मात्र, वीजबिल भरण्यास थोडा उशीर झाल्यास अधिकचे पैसे वसूल केले जातात. मग वीजसेवा नीट का पुरवण्यात येत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे काही ज्येष्ठ नागरिकांना कॉल सेंटरच्या नंबरवर फोन लावता येत नाही. त्यामुळे त्यांना मोबाईल नंबर द्यावे अशी मागणी होत आहे. काही नागरिक महावितरणाच्या कार्यालयात तक्रार देण्यासाठी गेले असता, त्यांना कॉल सेंटरशी संपर्क साधावे अशी उत्तरे देण्यात येतात.तसेच महावितरणकडे तक्रार दाखल करण्यासाठी नंबर दिला आहे. मात्र, तो अनेकदा लागत नाही. त्यामुळे स्थानिक तक्रार केंद्राचे नंबर जाहीर करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.