नाशिक: रेल्वेमध्ये नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांकडून उकळले तब्बल १५ कोटी
नाशिक (प्रतिनिधी): रेल्वेमध्ये टीसी आणि गेटमन पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष देत बेरोजगारांना तब्बल १५ कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी नांदगाव येथील सायबर कॅफेचालकासह पुणे येथील दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कॅफेचालक ज्ञानेश नथू सूर्यवंशी (रा. सोयगाव, मालेगाव) यास अटक केली.
पुणे येथील दोघे संशयित सतीश गंडू बुच्चे, संतोष शंकराव पाटील हे दोघे फरार आहेत.
याबाबत अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
नांदगाव पोलिस ठाण्यात चेतन शिवाजी इघे यांनी तक्रार दिली होती. संशयित ज्ञानेश सूर्यवंशी याच्या नांदगाव येथील सायबर कॅफेमध्ये नोकरीसंदर्भात फॉर्म भरण्यास ते जात होते. यावेळी सूर्यवंशी याने इघे आणि बेरोजगार तरुणांना मी तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरीस लावून देतो, टीसी पदासाठी १५ लाख आणि गेटमन पदासाठी १२ लाख रुपये लागतील.
तुम्हाला थेट जॉइन केले जाईल असे सांगितले. प्रत्येकाकडून पदानुसार पैसे घेतले. संशयिताने त्याचे पुणे येथील साथीदार सतीश गंडू बुच्चे, संतोष शंकर पाटील यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे सही-शिक्के असलेले बनावट नियुक्तिपत्र आणि सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल, भायखळा (मुंबई), बॉम्बे हॉस्पिटल (मुंबई) आणि मुखर्जी हॉस्पिटल, उत्तर रेल्वे (दिल्ली) या ठिकाणी मेडिकल झाल्याचे बनावट सही व शिक्के असलेले प्रमाणपत्र देत फिर्यादी आणि त्यांचे इतर साक्षीदारांकडून प्रत्येकी १५ व १२ लाख रुपये घेतले.
याप्रकरणी नांदगाव पोलिसांनी अधिक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित कॅफे चालकाला अटक केली. निरीक्षक रामेश्वर गाडे, ईश्वर पाटील, भारत कांदळकर, अनिल शेरेकर, सुनील कुऱ्हाडे, सागर कुमावत, संदीप मुंढे यांच्या पथकाने ही कारवाई केली.