![](http://nashikcalling.com/wp-content/uploads/2022/06/ncprintpromo01.png)
नाशिक: न विचारता व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये घेतल्याने अल्पवयीन मुलांचा तरुणावर हल्ला
नाशिक (प्रतिनिधी): क्षुल्लक कारणांवरून हाणामारी, खुनाचा प्रयत्न असे प्रकार नाशिकमध्ये वाढत चालले आहे.
आणि यात अल्पवयीन मुलेसुद्धा गुन्हेगारी मार्गाकडे वळत आहेत.
असाच एक प्रकार नाशिकच्या पंचवटी परिसरात घडला आहे.
न विचारता व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये घेतल्याने अल्पवयीन मुलांचा तरुणावर हल्ला करण्यात आला आहे.
पंचवटीच्या विजयनगर परिसरातील नागरिकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये न विचारता समाविष्ट केल्याच्या रागातून दोघा अल्पवयीन मुलांनी ग्रुप अॅडमिन भेटला नाही म्हणून त्याच्या मित्रावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. शनिवारी (दि. ४) देवी मंदिर ग्राउंड येथे सायंकाळी ४.३० वाजता हा प्रकार घडला.
याप्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सायंकाळी ४.३० वाजता दीपक काशीनाथ डावरे (२२) हा तरुण देवी मंदिर मैदानावर क्रिकेट खेळत असताना संशयित दोन अल्पवयीन मुले मैदानावर आली.
त्यांनी दीपक डावरेसोबत वाद घातला. शिवीगाळ करत एकाने सोबत आणलेल्या कोयत्याने दीपकच्या पोटावर वार केल्याने त्याचा कोथळा बाहेर आला. इतर मित्रांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. संशयितांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.