नाशिक (प्रतिनिधी): कोरोनामुळे गेल्या दहा ते अकरा महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील महाविद्यालये अखेर सोमवारी म्हणजेच १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून महाविद्यालयांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. सोमवारपासून जिल्हाभरातील ८० महाविद्यालये सुरू होत असून प्राध्यापकांची कोरोना चाचणीसुद्धा केली जात आहे.
सुरुवातीला ५० टक्के उपस्थितीत ऑफलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.. इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग नियमित सुरु झाल्यानंतर आता महाविद्यालयेही सुरू होणार आहेत..
नाशिक शहर व जिल्ह्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित पारंपरिक शाखांच्या वरिष्ठ महाविद्यालयांसह एमबीए, एमसीए, इंजिनिअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट या व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू होणार आहेत.. नाशिकमध्ये पारंपारिक व व्यावसायिक शाखांची एकूण ८० महाविद्यालये असून ५० टक्के उपस्थितीसह ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग होणार नाही, यासाठी यूजीसी व राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन महाविद्यालयांना करावे लागेल. त्यासाठी महाविद्यालयस्तरावर उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे.
इयत्ता नववी ते बारावीच्या वर्ग ४ जानेवारीपासून सुरू झाले. त्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला. शालेय वर्ग सुरळीत सुरू झाल्यानंतरही राज्यातील महाविद्यालय मात्र बंदच होते. याबाबत विद्यार्थी व पालकांसह विद्यार्थी संघटनांकडूनही महाविद्यालये सुरू करण्याची मागणी केली जात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.