नाशिकच्या सायबर विभागाचं यश: ऑनलाइन गंडविलेले 40 हजार महिलेला परत
नाशिक (प्रतिनिधी): सायबर गुन्हेगाराने फसविलेल्या महिलेला ३९ हजार ९९९ रुपये परत करून सायबर विभागाला यश आले.
पेटीएम केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर गुन्हेगाराने गंडविलेल्या पीडित तक्रारदाराला बुधवारी (ता. २९) पोलिसांकडून मुद्देमालाची रक्कम परत मिळवून दिली.
१४ फेब्रुवारी २०२० ला पेटीएम केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर गुन्हेगाराने तक्रारदार सुजाता उमेश कर्डिले यांना क्विक सपोर्ट हे रिमोट ॲक्सेस ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगून १९ हजार ९९९ रुपयांची फसवणूक केली होती.
श्रीमती कर्डिले यांच्याप्रमाणेच आणखी २६ जणांना सायबर गुन्हेगारांनी गंडविले होते. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना, कॅनरा बँकेतील पैसे पंजाब नॅशनल बँकेत वर्ग झाल्याचे पुढे आले. त्यावरून पोलिसांनी पैसे वर्ग झालेल्या बेंगळुरू येथील पंजाब नॅशनल बँकेच्या ज्या खात्यात पैसे जमा झाले, त्या खातेदाराचा शोध घेतला.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9511,9504,9493″]
सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दानिश मन्सुरी, संदीप बोराडे यांनी संबंधित खाते गोठविले. त्यातील ५९ हजारांची रक्कम होल्ड करून ठेवण्यासाठी बँकेकडे पाठपुरावा केला. त्यातील तक्रारदार श्रीमती कर्डिले यांचा ३९ हजार ९९९ रुपयांचा रकमेचा धनादेश बुधवारी वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली यांच्या उपस्थितीत तक्रारदाराला सुपूर्द करण्यात आला.
फोनवर अज्ञात व्यक्तीकडून खातेदारांना केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ओटीपीसह संवेदनशील माहिती मागून फसविण्याचे प्रकार उजेडात येत आहेत. त्यामुळे संवेदनशील माहिती फोनवरून कुणाला देऊ नये. असे आवाहन सूरज बिजली, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे यांनी केले आहे.