नाशिककरांनो, कोरोना लस घ्या, अन्यथा शासकीय लाभ नाही
नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात १६ लाख नागरिकांनी अद्याप कोरोना प्रतिबंध लसीचा पहिला डोस घेतला नाही.
राज्यात अनेक ठिकाणी हीच स्थिती आहे. हे घातक असून, लस न घेतलेल्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागेल, हा औरंगाबाद पॅटर्न राज्यात लावावा लागेल, असे सूतोवाच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी करताना नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. १२) कोरोनाची सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9040,9029,9024″]
ते म्हणाले, जिल्ह्यात १८ वर्षापुढील ५१ लाख नागरिक लसीसाठी पात्र आहे. ३५ लाख ४८ हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या १३ लाख ५२ हजार आहे. जिल्ह्यात अद्याप १६ लाख नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील. त्यासाठी ‘हर घर दस्तक’ ही मोहीम हाती घ्यावी लागेल. मालेगाव तालुका लसीकरणात पिछाडीवर आहे. त्या ठिकाणी अजान, मौलवींचे आवाहनाद्वारे जनजागृती गरजेची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पहिला डोस घेतला नसल्यास योजनांचा लाभ मिळणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. मेहेकरचे प्रांत गणेश राठोड यांनीही शासकीय योजनांसह मद्य खरेदीवर बंधने आणली. त्यामुळे लसीकरण वाढले नाही तर नाशिकसह राज्यभरात औरंगाबाद पॅटर्नसारखी कडक पावले उचलावी लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
आता लग्नसराईला सुरुवात होईल. परंतु, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विवाहसोहळ्यांसाठी लॉन्स आणि हॉलला बंधने लागू आहे. या अटी जाचक असल्याची खंत लॉन्सचालकांनी व्यक्त करत त्यात सूट देण्याची मागणी केली हाेती. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुजबळ यांनी बैठकीनंतर पत्रकारांसमाेर सावध भूमिका घेतली. लग्ने तर व्हायलाच हवी, असा लॉन्सचालकांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु, केव्हा निर्णय घेणार याबाबत स्पष्टता केली नाही.