
धक्कादायक: नाशिक शहरातील या भागात बंद गाळ्यात आढळले मानवी अवयव!
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई नाका परिसरात बंद गाळ्यांमध्ये मानवी अवयव आढळून आले आहेत.
हे अवयव एका रासायानामध्ये ठेवलेले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून हे गाळे बंद होते.
गाळा मालकाचीही याबाबत चौकशी सुरु आहे.
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या पाठीमागील एका इमारतीच्या तळमजल्यावरील वर्षानुवर्षे बंद असलेल्या गाळ्यामध्ये रविवारी (दि. २७ मार्च) रात्री मानवी अवयव आढळून आल्याने खळबळ उडाली.
पोलिसांनी गाळ्यातील दोन विशिष्ठ प्रकारचे डबे ताब्यात घेत उघडले असता त्यामध्ये रासायनिक द्रव्यपदार्थ टाकून ठेवलेले मानवाचे आठ कान, मेंदू, डोळे आणि चेहऱ्याचा काही भाग आढळून आला. हे अवयव या ठिकाणी कुणी आणि कोठून आणले, हा प्रश्न पोलिसांपुढे उभा आहे.
मुंबई नाका पोलीस ठाण्यामागे असलेल्या हरी विहार सोसायटीतील २० आणि २१ क्रमांकाचे दोन गाळे आहेत. हे गाळे गेल्या अनेक वर्षांपासून बंद होते. यापैकी एका गाळ्यातून गेल्या दोन दिवसांपासून विचित्र दुर्गंधी येत होती. रविवारी गाळ्याच्या शटरचा एक पत्रा एका बाजूने कुजलेला असल्याचे दिसले. तेथून दुर्गंधी सुटत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी दाखल झाला. उपयुक्त पौर्णिमा चौगुले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी दाखल झाले.
गाळा उघडला असता त्यामध्ये भंगार माल ठेवलेला आढळला. भंगारात प्लास्टिकचे दोन डबे वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असल्याचा पोलिसांना संशय आल्याने, ते डबे जेव्हा पोलिसांनी उघडले तेव्हा दुर्गंधीचा लोट पसरला. पोलिसांनी नाकातोंडाला मास्क लावून बॅटरीच्या सहाय्याने पाहणी केली असता द्रव रासायानामध्ये मानवी अवयव जतन करून ठेवण्यात आल्याचे दिसून आले.
फोरेन्सिक टीमने हे दोन्ही डबे ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी तत्काळ गाळामालक शुभांगिनी शिंदे यांना तसेच त्यांच्या दोन्ही डॉक्टर मुलांनाही बोलावून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नाशिक शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.