नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील पालखेडरोडजवळ असलेल्या दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने ६ दुकाने भस्मसात झाली. या घटनेने लाखोंचे नुकसान झाले असून, परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पहाटे सव्वातीनच्या सुमारास लागलेल्या या आगीत मोबाईल, ग्लास हाऊस, इलेकट्रॉनिक, टीव्ही या वस्तूंची दुकाने जळून खाक झाली. दरम्यान, आग लागल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच नाशिक अग्निशमन दलाला संपर्क केले असता, अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याने व्यावसायिक हतबल झाले आहेत. कारण आधीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते.
त्यामुळे व्यापारी व व्यावसायिक वर्गाला याचा मोठा आर्थिक फटका बसला होता. तरी परिस्थितीवर मात करत व्यापारी व व्यावसायिक आपला व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, अचानक लागलेल्या या आगीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई कशी करावी व पुन्हा व्यवसाय कसा उभा करावा असे प्रश्न उभे राहिले आहेत.