नाशिक (प्रतिनिधी) : म्हसरूळ परिसरातील मेरी लिंक रोडवर असलेल्या हायस्ट्रीट मार्ट नावाच्या सुकामेवा आणि किरणा मालाच्या सुपर मार्केटमध्ये काल (दि. १७ ऑगस्ट) आधुनिक पद्धतीने चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. पीपीई किट घालून या चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळतेय. गेल्या आठवड्यात शहरातील काही भागात अशाच प्रकारे पीपीई कीट घालून ज्वेलर्स च्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यामुळे पीपीई कीट घालून चोरी करण्याची ही अनोखी पद्धत पोलिसांसाठी एक नवीन आव्हानच आहे.
हायस्ट्रीट मार्टचे मालक आकाश बोंडे शनिवारी रात्रीच्या सुमारास दुकानं बंद करून घरी गेले. त्यानंतर रविवारी दुकानं बंद असल्याने सोमवारी (दि.१७) सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांना आपल्या दुकानात चोरी झाल्याचे समजले. त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पहिले असता पहाटे चारच्या सुमारास अल्टो गाडीमधून पीपीई कीट घालून चार अज्ञात चोरटे उतरले आणि दुकानात शिरून सुकामेवा आणि गल्ल्यातील ९ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. गेल्या आठवड्यात सुद्धा अशाच प्रकारे चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या म्हणून ही एकच टोळी असल्याची शक्यात पोलिसांनी वर्तवली आहे.