नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीमार्फत शहरात घरोघरी गॅस पुरवण्यासाठी रस्ते खोदल्यामुळे भलेमोठे खड्डे पडून असून त्यात अपघात होत असल्यामुळे वाढत्या तक्रारी लक्षात घेत हे खड्डे १५ जूनपर्यंत बुजविण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
नाशिक शहरात घरोघरी थेट पाइपलाइनद्वारे स्वयंपाकाचा गॅस पुरविण्यासाठी पहिल्या टप्प्यात शहरात २०५ किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकली जात आहे. मुख्य रस्ते खोदाईसाठी दोन तर एमडीपी अर्थात प्लॅस्टिक पाइपलाइन टाकण्यासाठी ४१ ठेकेदारांना काम देण्यात आले आहे.
रस्त्याच्या कडेला पाइपलाइन खोदताना ५० ते १०० मीटर खोदून तेथील काम पूर्ण झाल्यानंतर पुढील खोदाई करावी असे अटी व शर्तींमध्ये नमूद करण्यात आले असताना नियमबाह्यपणे खोदकाम काम सुरू असल्यामुळे भलेमोठे खड्डे रस्त्यांवर पडले आहे.
खड्डे करताना भूमिगत वीजतारा तुटून वीजपुरवठा खंडित होत असल्याचे प्रकार घडत आहे तर जलवाहिनीबाबतही अशाच तक्रारी आहेत. पावसाळ्यामध्ये या खड्ड्यांमध्ये पाणी साचून मोठा अपघात होण्याची भीती लक्षात घेता शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे १५ जूनपर्यंत बुजविण्याचा अल्टिमेटम आयुक्त जाधव यांनी बांधकाम विभागाला दिला आहे. दरम्यान, महापालिकेने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीकडून तब्बल ७९ कोटी रुपयांचा दुरुस्ती खर्च वसूल केला आहे. आतापर्यंत शहरातील ८० कि. मी. लांबीचे रस्ते पाइपलाइनसाठी खोदण्यात आले आहेत.