नाशिक (प्रतिनिधी) : विनापरवाना शस्त्र बाळगून, दहशत निर्माण करण्याच्या तयारीत असलेल्या २ इसमांची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. दरम्यान, पथकाने छापा टाकून, त्यांच्याकडील २ तलवारी हस्तगत केल्या आहेत. तर, लुटीच्या गुन्ह्यातील १९ वर्षीय फरार आरोपीला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.
सोमवारी (दि. ७ डिसेंबर) रोजी शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी पेट्रोलियम करत होते. दरम्यान हवालदार सुनील भालेराव यांना आडगाव परिसरात काही इसम तलवार घेऊन दहशत पसरवण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने हॉटेल गावरान तडकाच्या बाजूला लपून बसलेल्या दिनेश तात्याराव तांबे (वय,२० रा.पाटोदा,जालना) व त्याचा अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून २ तलवारी देखील हस्तगत करण्यात आल्या. तर, शस्त्र बाळगण्यास मनाई असलेल्या कायद्याचे उल्लंघन केले म्हणून, त्यांच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी विकास उर्फ विकी प्रकाश कंकाळ (वय,१९ रा.भीमनगर,सातपूर) याच्यावर चाकूचा धाक दाखवून सोन्याची अंगठी व साखळी चोरून नेल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल आहे. या प्रकरणाचा तपास करत असतांना पोलीस कॉन्स्टेबल अतुल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून, गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीस ताब्यात घेण्यात आले.