उद्योगांवरील कारवाई तातडीने थांबविण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
नाशिक (प्रतिनिधी): ईटीपी प्रकल्पाचे कारण देत प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंधरा इलेक्ट्रोप्लेटिंग उद्योगांना क्लोजर नोटीस दिल्या होत्या. यानंतर या उद्योगांचे पाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विनाविलंब कापले होते. यामुळे सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतील किमान दीडशे उदयोग अडचणीत येतील अशी भीती व्यक्त होत होती.
या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी या उद्योगांवरील कारवाई तातडीने थांबवून त्यांचे पाणी पूर्ववत सुरू करा, असे आदेश रविवारी दिले. संपूर्ण राज्यासाठी एकच धोरण जर असेल तर ते नाशिकसाठीच वेगळे कसे?असा जाबही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने १५ प्लेटिंग उद्योगांना क्लोजर नोटीस दिल्यानंतर एमआयडीसीला या उद्योगांचे पाणी तोडण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार शुक्रवारी या उद्योगांचे पाणी तोडण्यात आले होते, यामुळे संतप्त उद्योजकांनी अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि नाशिक सीईटीपी असोसिएशन व नाशिक मेटल फिनिशर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत त्यांच्याकडे तक्रार केली होती.
यानुसार भुजबळ यांनी तातडीने रविवारी सुटीचा दिवस असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांसह संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. कोरोना काळात उद्योग अडचणीतून जात असताना अशी कारवाई अतिशय चुकीची असल्याचे सांगून भुजबळ यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव शिनगारे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून प्रादेशिक अधिकारी जोशी यांना ताबडतोब उद्योग सुरू करावेत व अशी कारवाई करू नये, असे आदेश दिले. बैठकीला आयमाच्या विश्वस्त समितीचे चेअरमन धनंजय बेळे, उपाध्यक्ष निखिल पांचाल, राजेंद्र अहिरे, समीर पटवा, इंदरपाल सहानी, सुदर्शन डोंगरे, राधाकृष्ण नाईकवाडे, आशिष कुलकर्णी यांसह एमअायडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रवीण जोशी सहप्रादेशिक अधिकारी दुर्गुळे अादी उपस्थित हाेते.