गंगापूर धरणातून होणारा विसर्ग रविवारी थांबवला
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरासह जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून साेडण्यात येणारा विसर्ग रविवारी दुपारी थांबविण्यात आला आहे. गंगापूर धरण क्षेत्रात पडणारा पाऊस कमी झाल्याने हा विसर्ग थांबवण्यात आला. त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुक्याच्या पश्चिम भागात पडणाऱ्या पावसाचे पाणी गंगापूर धरणात येते.
सध्या या परिसरात पाऊस थांबला असल्याने गंगापूर धरणातून होणारा विसर्गही पाटबंधारे विभागाकडून थांबविण्यात आला आहे. पाच सहा दिवसापूर्वी हा विसर्ग तीन हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला हाेता. ताे टप्प्याटप्प्याने कमी करत रविवारी दुपारी पूर्णपणे थांबविण्यात आला आहे. सध्या गंगापूर धरणात ७६.१६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. याचबराेबर काश्यपी धरणात ४८.७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गाैतमी धरणात ५८.०३ टक्के पाणीसाठा आहे. धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत नाही, ताेपर्यंत गंगापूर धरणातून हाेणारा विसर्ग तूर्तास बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असून शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. निफाड, येवला, चांदवड, नांदगाव या भागात कडक उन पडत असून पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे.