नाशिक (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून स्थानिक अधिकाऱ्यांच्या वादामुळे सिडको व इंदिरानगर परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. यामुळे संतप्त नगरसेवकांनी या विरोधात आंदोलन छेडले होते. म्हणून याबाबत महापौर सतीश कुलकर्णी यांनी तातडीने संयुक्त बैठक घेत, सिडकोला मुकणेसह गंगापूर धरणातूनही पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.
मंगळवारी (दि.८ डिसेंबर) रोजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सिडकोतील सर्वपक्षीय नगरसेवक व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी असा निष्कर्ष काढण्यात आला की, मुकणे धरणातून सिडकोला पाणीपुरवठा तर केला जातोच सोबत मुकणे पाईपलाईनमधून पंचवटी व नाशिकरोडलाही पाणीपुरवठा होतो. त्यामुळे सिडकोला कमी दाबाने पाणी येते. म्हणून सिडकोला मुकणेसह गंगापूर धरणातूनही पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापौर यांनी घेतला. तसेच पाथर्डी येथील जलकुंभातून इंदिरानगर आणि सिडको परिसरासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे आदेश देखील महापौर यांनी दिले.