१२+ मुलांचे लसीकरण उद्यापासून; ६०+ वरील सर्व ज्येष्ठांना बूस्टर डोस मिळणार
नाशिक (प्रतिनिधी): केंद्र सरकारने १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणास मंजुरी दिली आहे.
या वयोगटाला बुधवारपासून (दि. १६ मार्च २०२२) बायोलॉजिकल-ईची लस “कोर्बोव्हॅक्स’ दिली जाईल.
६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांनाही बुधवारपासून बूस्टर डोस दिला जाईल.
आतापर्यंत ६० वर्षांवरील गंभीर आजारी ज्येष्ठांना बूस्टर डोस दिला जात होता.
बूस्टर डोस “कोव्हॅक्सीन’चा आहे. ही लस १५ ते १७ वयोगटातील किशोरवयीनांना टोचली जात आहे. १२-१४ वयातील मुलांच्या लसीकरणासाठी बॉयोलॉजिकल-ईशी ३० कोटी डोसचा करार केला आहे. केंद्राला ५ कोटी डोस मिळाले आहेत. या वयोगटाची लोकसंख्या ७ कोटी आहे.
सव्वादोन वर्षांच्या कोरोनाकाळात पहिल्यांदाच चीनमध्ये भारतापेक्षा जास्त रुग्ण:
वाढता कोरोना संसर्ग पाहून चीनच्या शेन्झेन, जिलिन, चांगचून आणि शंघाई या ४ शहरांत सोमवारपासून कडक निर्बंध लावले आहेत. या शहरांत एकूण ८ कोटी लोक राहतात. चीनने सर्व औद्योगिक शहरे एक आठवड्यासाठी बंद ठेवली आहेत. बीजिंगमध्ये येण्या-जाण्यासाठी परवानगी आवश्यक. संसर्ग वाढण्याचे कारण ओमायक्रॉन आहे. त्यामुळे रुग्णांचा मृत्यू होताना दिसत नाही. लॉकडाऊनमुळे आयफोनची निर्मिती थांबली, नागरिक क्वाॅरंटाइन आहेत. सर्व बस आणि सब-वे बंद केले आहेत. त्यामुळे शेन्झेनमध्ये आयफोनचा सर्वात मेठा निर्मिती प्रकल्प बंद राहील. लोकांना शहर सोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शेन्झेनमध्ये काेराेनाचा वाढता संसर्ग पाहता हाँगकाँगमध्येही सुमारे ३ लाख लोक होम आयसोलेशनमध्ये आहेत.