नाशिक (प्रतिनिधी): ओळखीचा गैरफायदा घेत युवतीवर लग्नासाठी वारंवार दबाव टाकणाऱ्या तरुणावर सातपूर पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान गुन्हा दाखल करण्यास पोलिस टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत भाजपच्या शिष्टमंडळाने रविवारी पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, श्रमिकनगर परिसरात राहणाऱ्या एका युवतीवर संशयित ईप्तसम तय्यब खान (२४) हा सोमेश्वर कॉलनी येथे राहणारा तरुण सन २०१९ पासून गेल्या काही महिन्यांपासून लग्न करण्यासाठी त्रास देत होता.
रस्त्यात युवतीची दुचाकी अडवून लग्न करत नाही तर शारिरीक सबंध ठेव, अशी मागणी करत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून युवतीने सातपूर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. मात्र पोलिसांनी अर्जाची दखल घेतली नसल्याची तक्रार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.
रविवारी भाजपचे शहराध्यक्ष गीरीश पालवे, रामहरी संभेराव, राजेश दराडे, जगन पाटील, गौरव बोडके, चारुदत्त आहेर आदींनी सातपूर पोलिस ठाण्यात धाव घेत युवतीला न्याय देतानाच संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पीडित युवतीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन तरुणास अटक केली. पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.