शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या पाठपुराव्याला यश
नाशिक (प्रतिनिधी): उंटवाडीतील तिडकेनगर, कर्मयोगीनगर, खोडे मळा, खांडे मळा यासह प्रभाग २४ मधील सुमारे पंचवीस वर्षे जुनी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. महापालिकेने याबाबतची निविदा गुरुवारी, २१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली आहे. यामुळे या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न येत्या काही दिवसात मार्गी लागणार आहे. शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
प्रभाग क्रमांक २४ मधील जगतापनगर, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, प्रियंका पार्क, कालिका पार्क, खांडे मळा, खोडे मळा, पांगरे मळा येथे काही ठिकाणी अद्यापही २४ वर्षे जुनी पाईपलाईन आहे. ती कुजल्यामुळे अनेक ठिकाणी लिक असल्याने पाणी वाया जाते. परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ही पाईपलाईन बदलावी, नवीन पाईपलाईन टाकावी, अशी मागणी सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशिला गायकवाड (देशमुख) यांच्यासह नागरिकांनी केली होती.
२३ सप्टेंबर २०२१ रोजी याबाबत महापालिकेला निवेदनही दिले होते. सततच्या पाठपुराव्यानंतर गुरुवारी, २१ ऑक्टोबर २०२१ रोजी ३२ लाख २४ हजार ९२५ रुपयांच्या पाईपलाईनच्या कामाची निविदा वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. रहिवाशांच्या मागणीची दखल घेतल्याबद्दल बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशिला गायकवाड (देशमुख), शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, प्रभाकर खैरनार, संगिता देशमुख, रवींद्र सोनजे, विनोद पोळ, श्रीकांत नाईक, दिलीप दिवाने, श्याम अमृतकर, प्रतिभा वडगे, ज्योती वडाळकर, बन्सीलाल पाटील, शैलेश महाजन, मकरंद पुरेकर, डॉ. सुनील चौधरी, डॉ. राजाराम चोपडे, डॉ. शशिकांत मोरे, मनोज वाणी, बाळासाहेब राऊतराय, प्रथमेश पाटकर आदींनी महापालिका आयुक्तांसह अधिकार्यांचे आभार मानले आहेत.
अशी असेल पाईपलाईन:
या भागातील २४ वर्षे जुनी पाईपलाईन ही पीव्हीसी पाईपच्या स्वरुपातील आहे. आता ती काढून नवीन लोखंडी पाईप (डीआय) लाईन टाकली जाईल. आवश्यकतेनुसार चार, सहा आणि आठ इंच व्यासाचे पाईप टाकले जाणार आहेत. यामुळे पुरेसा पाणीपुरवठा होणार आहे.