पोलिस चौकीत मद्य पार्टी करणाऱ्या चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई
नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर पोलिस ठाण्यांतर्गत दादोजी कोंडदेवनगर पोलिस चौकीतच मद्य पार्टी करणाऱ्या रघुनाथ ठाकूर, सुरेश जाधव, मयूर सिंग, सागर बोधले या चार पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिले आहेत.
या प्रकरणाची विभागीय चौकशीही होणार आहे.
याबाबत पोलिस आयुक्त पांडेय यांच्या माहितीनुसार, डीकेनगर येथील गार्डनमध्ये मद्यपी तरुण अश्लील चाळे करत होते.
त्याची तक्रार देण्यासाठी नागरिक डीकेनगर पोलिस चौकीत गेले होते. मात्र, येथे पोलिस मद्य प्राशन करत असल्याचे दिसले. दोघा पोलिसांनी एका नागरिकाला मारहाण केली.
काही नागरिकांनी चौकीतील मद्याच्या बाटल्या, भरलेले ग्लास आणि खाद्यपदार्थांचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. हा प्रकार बघून संशयित पोलिसांनी पळ काढला. हा प्रकार आमदार सीमा हिरे यांनी पोलिस आयुक्तांना कळवला.
त्यांनी तत्काळ उपआयुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांनी धाव घेत घेतली. बुधवारी सकाळी उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांनी निलंबनाची कारवाई केली.शहर पोलिस आयुक्तालयातील ७२ पैकी ६५ पोलिस चौक्या अनधिकृत असल्याचा गौप्यस्फोट पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी केला. राजकीय दबावामुळे तत्कालीन अधिकाऱ्यांनी पोलिस महासंचालकांची मान्यता न घेता या चौक्या सुरू केल्याचे सांगत तीन महिन्यांत या चौक्यांबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पांडेय यांनी नागरिकांना दिले.