नाशिक: वीज पडून तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): बागलाण तालुक्यातील देवळाणे परिसरात आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली.

यावेळी पिंपळाच्या झाडालगत उभ्या असलेल्या पवन सोनवणे (13) या मुलाचा अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर शेजारी असलेले शेतकरी गंगाराम सोनवणे यांना वीजेचा शॉक लागून जखमी झाले.

देवळाणे येथील रामभाऊ सोनवणे हे धनगर समाजाचे कुटुंब शेती नसल्याने कुटुंबासह मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. त्यांना दोन मुले असून सोनवणे कुंटुब दुसर्‍याच्या शेतात मोलमजुरीने काम करत होते.

चाळीतील कांदा विक्रीसाठी पिंपळाच्या झाडाखाली पिकअप वाहनांत भरत होते. मुलगा पवन हा त्यांच्यासोबत होता.

दुपारी जोरदार वादळी वार्‍यासह पावसास प्रारंभ झाला. पिंपळाच्या झाडाजवळ उभ्या असलेल्या पवनवर अचानक विज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर शेतकरी गंगाराम सोनवणे उजव्या हाताला वीजेचा धक्का लागून जखमी झाले. त्यांच्यावर सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पवन हा मनमिळावू व हुषार विद्यार्थी होता. त्याचा दुर्दैवी अंत झाल्याने शिक्षकांसह गांवासह परिसरात शोककळा पसरली आहे.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790