नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिक: फेसबुक लाईक पडली तब्बल पाच लाखात! उत्तर प्रदेशातील आरोपीस अटक
नाशिक (प्रतिनिधी): फेसबुकवरील एका व्यावसायिक पोस्टला लाईक केल्यानंतर संबंधित व्यक्तीने पाठपुरावा करून वेळोवेळी विविध अमिष दाखवून तब्बल पाच लाख 13 हजार 200 रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
नाशिक सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बिजली आणि पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून उत्तरप्रदेशातील गाजियाबाद येथील आरोपीला ताब्यात घेतले. त्यास कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत तक्रारदार सविता अविनाश पवार यांनी 27 सप्टेंबर रोजी 2022 रोजी फसवणूक झाल्याची तक्रार नाशिकच्या सायबर पोलिसांकडे केली होती. त्याचा तपास करीत पोलिसांनी गाझियाबाद येथील नितीश रमेश कुमार (रा. खोडा कॉलनी,गाझियाबाद) यास शिताफीने अटक करून गाझियाबाद कोर्टाचा ट्रान्झिट रिमांड घेऊन नाशिकला आणले तर याच फसवणूक प्रकरणी आणखी एक संशयित राज सोमवीर राघव (रा.शिवपुरी न्यू विजयनगर, गाझियाबाद) हा फसवणूक करणार्या कंपनीचा संचालक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सविता पवार यांनी सायबर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी व्यापार इन्फो इंडिया प्रा.लि. असे नाव असलेल्या फेसबुक पेजला लाईक केले होते.
त्यावरून पाठपुरावा करीत आरोपींनी प्रथम तुमच्या व्यवसायाची वृद्धी करून देऊ, कस्टमर प्लॅटफार्मर तयार करून देऊ, असे सांगून 26 हजार रुपये रजिस्ट्रेेशनसाठी भरण्यास सांगितले. त्यास नकार दिला. तरीही पुन्हा फोन करून कमीत कमी एक हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन करा, असा आग्रह केला.
फिर्यादी सविता पवार यांनी ही रक्कम ऑनलाईन भरली. त्यानंतरही वेबसाईट तयार करण्यासाठी, फिर्यादीच्या प्रॉडक्टची फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, अॅमेझान आदी सोशल मिडियावर जाहिरात करून देऊन, ऑनलाईन कस्टमर मिळवून देऊ, कस्टमरकडून पेमेंट मिळविण्यासाठी आवश्यक असलेली पेमेंट गेटवे लिंक तयार करून देऊ, आदी अमिषे दाखवून वेळोवेळी रक्कम भरावयास लावली. नंतर एक मोठा खरेदीदार तुमचे प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी तयार आहे, त्यासाठी पेमेंट गेटवेची मर्यादा वाढवावी लागेल, असे सांगून वेळोवेळी विविध कारणांनी फिर्यादीस पैसे भरायला लावले.
या प्रमाणे एकूण पाच लाख 13 हजार 200 रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली व उपनिरीक्षक संदीप बोराडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याची आरोपींच्या बँक खात्याची माहिती घेतली.
व्यापार इन्फो इंडिया प्रा. लि. या नावाने या कंपनीचे करंट खाते असून, नितीश रमेश कुमार रा. खोडा कॉलनी, गौतमबुद्धनगर,गाझियाबाद व राज सोमवीर राघव (रा. शिवपुरी, न्यू विजयनगर, गाझियाबादअसे असल्याचे दिसून आले.
प्रमुख आरोपी नितीश रमेश कुमार याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश बिजली यांनी सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप बोराडे, हवालदार शहाजी भोर, पोलीस नाईक चंद्रकांत पाटील यांचे पथक 15 मार्च रोजी गाझियाबाद येथे रवाना केले.
या पथकाने प्रमुख आरोपी नितीश रमेश कुमार यास शिताफीने अटक करून स्थानिक कोर्टाचा ट्रान्झिट रिमांड घेऊन नाशिकला आणले व दि. 21 मार्च रोजी नाशिकच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
यशस्वी तपासाबद्दल पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव आदींनी या पथकाचे अभिनंदन केले. तसेच ग्राहकांनी फसव्या जाहिराती आणि ऑनलाईन स्कीममध्ये गुंतवणूक करू नका, कोणतीही फसवणूक झाल्यास नॅशनल सायबर क्राईम वेबसाईटवर किंवा नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी नाशिककरांना केले आहे.