नाशिक (प्रतिनिधी): पार्टटाईम जॉब देण्याची बतावणी करून अज्ञात भामट्यांनी एका महिलेला साडेसहा लाख रुपयांचा गंडा घातल्याची नोंद सायबर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही महात्मानगर परिसरात राहते. ही महिला नोकरीच्या शोधात असताना तिला टेलिग्राम ग्रुप ‘मनी मेक सिंपल’चे संचालक असल्याचे सांगून एका इसमाने फिर्यादी महिलेशी ऑनलाईन संपर्क साधला. “तुम्हाला पार्टटाईम जॉब मिळवून देतो,” अशी बतावणी केली.
त्यावर त्या महिलेचा विश्वास बसला. त्यानंतर अज्ञात इसमाने इंटरनेटच्या माध्यमातून त्यांना खोटे जॉब देऊन वेगवेगळ्या बँक खात्यांवर वारंवार पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार या महिलेने वेळोवेळी सांगितलेल्या बँक खात्यांवर सुमारे 6 लाख 40 हजार 540 रुपये ऑनलाईन पैसे जमा केले; मात्र तरीही पार्टटाईम जॉब मिळाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. हा प्रकार दि. 4 ते 24 फेब्रुवारी 2023 दरम्यान घडला.
एवढे पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे महिलेने सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे करीत आहेत.