नाशिक: गंगापूर रोडला लिफ्टच्या खड्ड्यात पडून १० वर्षीय मुलाचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर शिवारातील ध्रुवनगरमध्ये सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या लिफ्टच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून यश सुभाष भागवत या दहा वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला.
याप्रकरणी अपूर्व बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्सचे अपूर्व राजेंद्र तोंडूलकर याच्याविरोधात गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष सोपान भागवत यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा मित्रांसमवेत ध्रुवनगर येथे सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी खेळत होते. त्या वेळी बांधकामाच्या ठिकाणी लिफ्टसाठी खड्डा तयार करून त्यात पाणी भरण्यात आलेले होते.
याच खड्ड्यात यश पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन पाण्यात बुडून तो मरण पावला. बांधकामाच्या ठिकाणी संशयित बिल्डर तोंडुलकर याने इमारतीचे बांधकाम करताना प्लॉटच्या चहूबाजूला पत्र्यांचे कंपाउंड केलेले नाही. त्याठिकाणी वॉचमनही नेमलेला नाही. लिफ्टच्या खड्ड्याभोवतील कोणत्याही संरक्षक उपाययोजना करण्यात आलेला नव्हत्या. तोंडूलकर यांच्याविरोधात बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक शेंडकर तपास करीत आहेत.