नाशिक: एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या भावाच्या गळ्याला चाकू लावत तीचे केले अपहरण
नाशिक (प्रतिनिधी): एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीच्या घरात घुसून तिच्या भावाच्या गळ्याला चाकू लावत तीचे अपहरण केले.
तिने लग्नासाठी नकार दिल्यावर बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. ४) रात्री पंचवटीत उघडकीस आला.
संशयित राज पोपट मते, वय २२ याच्या विरोधात रविवार (दि. ५) सकाळी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, घरी असताना संशयित राज मते हा बळजबरीने घरात आला. तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे बोलत पीडित तरुणीचा हात पकडून तीला बाहेर ओढले.
तरुणीचा भाऊ मध्ये पडला असता संशयिताने त्याच्या गळ्याला चाकू लावत, तरुणीला बळबजरीने दुचाकीवर बसवून रामशेज किल्ल्याजवळ एका निर्जनस्थळी घेऊन गेला. तू माझ्यासोबत आत्ताच्या आता लग्न कर आपण गुजरातला पळून जाऊ असे बोलला. त्याला तरुणीने नकार देताच त्याने तीला खाली पाडून बेदम मारहाण केली. हातातील लोखंडी कड्याने डोक्यावर तोंडावर मारून गंभीर जखमी केले. मारहाण केल्यावर त्यानेच तिला दिंडोरीतील खासगी दवाखान्यात नेले. आपण गाडीवरून पडलो असे दवाखान्यात सांग अशी धमकीही दिली. पीडितेने डॉक्टरांना खरा प्रकार सांगितला. त्यानंतर तीच्या कुटुंबीयांना फोनद्वारे माहिती दिली. कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान संशयित राज मते हा फरार झाला आहे.