नाशिक: आज मध्यरात्रीपासून सिटीलिंककडून बस भाडेवाढ
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (सिटीलिंक) कडून १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.
भाडेवाढीमुळे काही प्रमाणात सिटीलिंक कंपनीचा तोटा भरून निघणार असला तरी सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र झळ बसणार आहे.
महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून जुलै २०२१ पासून शहर आणि लगतच्या २० किलोमीटर लांबीपर्यंतच्या ग्रामीण भागात ‘सिटीलिंक-कनेक्टिंग नाशिक’ बससेवा चालविली जाते.
सद्यःस्थितीत ही बससेवा तोट्यात असली तरी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचे सक्षमीकरण आणि नागरिकांना सार्वजनिक परिवहन व्यवस्था उपलब्ध करून देणे हा या बससेवेमागील महापालिकेचा उद्देश आहे. सिटीलिंकच्या करारानुसार दरवर्षी पाच टक्के प्रवासी भाडेवाढ अनुज्ञेय आहे.
जानेवारी २०२२ मध्ये पहिल्या टप्प्यातील पाच टक्के प्रवासी भाडे दरवाढ करण्यात आली होती. मात्र, गेल्या वर्षभरात डिझेल आणि सीएनजीच्या दरात झालेल्या भरमसाट वाढीमुळे सिटीलिंकचा तोटा वाढल्याने यंदा पाच टक्क्यांऐवजी सात टक्के भाडेवाढीचा निर्णय सिटीलिंकने घेतला.
- नाशिक: अशोकस्तंभावर वाहनावरील ताबा सुटून गाडी शिरली मिठाईच्या दुकानात
- नाशिक: धक्कादायक! ५० रुपयांसाठी पतीने केली पत्नीची हत्या
- Breaking: नाशिक शहरातील दुहेरी खून खटल्यात रवी निकाळजेसह चार जणांना जन्मठेपेची शिक्षा
वाढणारे इंधन दर लक्षात घेता, परिणामी वाढणारा आर्थिक तोटा लक्षात घेता ही भाडेवाढ करण्यात आल्याचे सिटीलिंक कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले. एक जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात येणारी भाडेवाढ उशिराने अखेर १५ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आली आहे.
नियमाने भाडेवाढ:
वाढलेले इंधन दर बघता तसेच प्रवासी हिताचा विचार करता कोणतीही अतिरिक्त भाडेवाढ न करता केवळ नियमांनुसार भाडेवाढ करण्यात आली आहे. सुखकर, अद्ययावत, सुरक्षित प्रवास नाशिककरांना उपलब्ध करून देण्यासाठी सिटीलिंक नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्रवासी नागरिकांनी सिटीलिंकच्या भाडेवाढीच्या निर्णयाला देखील सहकार्य करावे असे आवाहन सिटीलिंक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी चव्हाणके यांनी केले आहे.