नाशिक (प्रतिनिधी) : गणेशविसर्जनासाठी महापालिकेकडून कृत्रिम कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच या वर्षी मूर्ती संकलानाचा उपक्रम सुद्धा महापालिकेकडून राबविण्यात आला होता. मात्र या संकलन केलेल्या मूर्तींचे महापालिकेकडून चुकीच्या पद्धतीने विसर्जन करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. संकलित केलेल्या गणेशमूर्ती चक्क विहिरीत टाकून त्यांचे विसर्जन करण्यात आल्याची धक्कादायक माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.
उंटवाडी परिसरात जुनी विहीर खोदून त्यामध्ये एका पत्र्याच्या सहाय्याने भाविकांनी दान केलेल्या गणेशमूर्ती विहिरीत टाकून त्यांचे विसर्जन करण्यात आले. या प्रकारामुळे अनेक भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक तसेच भाविकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.