दुचाकी चोरणारा सराईत चोरटा अटकेत; आठ दुचाकी हस्तगत
नाशिक (प्रतिनिधी): सराईत दुचाकी चोराकडून चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. भद्रकाली पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने ही कारवाई केली. जक्की अख्तर शेख (रा. खडकाळी) असे या चोराचे नाव आहे. त्याच्याविरोधात दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल आहेत.
दुचाकीचोरीसंदर्भात दाखल गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत संशयितांचा माग काढला. गाडगे महाराज पुतळा, मेनरोड येथून दुचाकी चोरी झाली होती. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. त्याआधारे सीसीटीव्हीमधील वर्णनाचा संशयित कन्नमवार पूल परिसरात आला असल्याची माहिती मिळाली.
पथकाने संशयिताला ताब्यात घेत चौकशी केली असता आठ दुचाकी चोरी केल्याची कबुली त्याने दिली. सरकारवाडा, गंगापूर पोलिस स्टेशन हद्दीतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने आठ दुचाकी हस्तगत केल्या. वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे, दत्ता पवार, ज्ञानेश्वर मोहिते, भगवान जाधव, रमेश कोळी, सचिन म्हसदे, सागर निकुंभ, जितेंद्र पवार, बंटी सय्यद यांच्या पथकाने ही कारवाई केली. चोरट्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.