नाशिक: नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांबाबत महत्वाची बातमी..

नाशिक (प्रतिनिधी): नगर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे बघून नाशिक महापालिकेनेही आता वेळेवर कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपवण्याची तयारी सुरू केली आहे. आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेन टेस्ट वाढवल्या जाणार आहेत.
विशेष म्हणजे गेल्या वेळी रुग्णाला होम क्वारंटाइन ठेवल्यानंतर कोरोनाचा अधिक प्रसार झाल्याचे लक्षात घेत यापुढे रुग्णांना घरगुती अलगीकरणात न ठेवता कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नाशिक महापालिका क्षेत्रात हाहाकार माजवला. वास्तविक फेब्रुवारीत रुग्ण आढळून लागल्यानंतर पालिकेने होम क्वारंटाइनचा पर्याय बंद करणे गरजेचे होते. अनेक रुग्णांकडून पुरेशी दक्षता न घेतल्याने कुटुंबेच्या कुटुंबे बाधित झाली. आता केव्हाही तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे महापालिकेने जास्तीत जास्त कोविड केअर सेंटर वाढवणे, तेथे ऑक्सिजनचे बेड उपलब्ध करून देणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या शहरात ५० च्या आसपास कोरोना रुग्णसंख्या सापडत असली तरी, हा आकडा शून्यावर आलेला नाही. त्यात, शेजारील नगरसारख्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असताना तेथून नाशिकमध्ये प्रसार होण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेत, पालिकेच्या वैद्यकीय विभागाला कोविड सेंटरमधील सुविधा वाढविण्यासह बाधित रुग्णांशी संपर्क साधून घरात उपचारासाठी न थांबता त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याच्या सूचना विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सारी, इलीचे सर्वेक्षण करा : नवीन नियमावलीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके नेमून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. विनामास्क व्यक्तींवर पुन्हा एकदा कारवाई केली जाणार आहे. याबरोबर सारी व इलीसारख्या आजाराचे रुग्ण किती आहे याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.