चिमुकली कारमधून बाहेर आली आणि रस्ता चुकली.. पोलिसांनी लावला अर्ध्या तासात शोध !
नाशिक (प्रतिनिधी): आई-वडिलांसोबत कपडे खरेदी करण्यास आलेली मुलगी बेपत्ता झाली होती. भद्रकाली पोलिसांनी परिसरात शोध घेत अर्धातासात तिचा शोध लावला. रविवारी (दि. १०) शालीमार येथे हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, औरंगाबाद रोडवरील एक कुटुंब सात वर्षीय मुलीला घेऊन शालीमार येथे कपडे खरेदी करण्यासाठी आले होते.
मुलीला कारमध्ये थांबवत आई-वडील कपडे खरेदी करण्यास गेले. मात्र बराच वेळ होऊन मम्मी-पप्पा येत नसल्याने मुलीने कारचा दरवाजा उघडून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र गर्दीमध्ये ती रस्ता चुकली.
काही वेळात तिचे आई-वडील कारजवळ आले. कारमध्ये मुलगी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र मुलगी मिळून आली नाही. शालीमार येथील पोलिस चौकीत तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक संभाजी निंबाळकर, दत्ता पवार. प्रणिता पवार आणि कर्मचारी संदीप आहेर, विशाल वाघ, सतीश साळुंके, प्रशांत जेऊघाले, प्रभू बडगे यांच्या पथकाने शालीमार परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला. पथकाचे आहेर यांना मुलगी यशवंत व्यायाम शाळा येथे मिळून आली. तिची ओळख पटवून तिला आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात आले.