नाशिक कोर्टात पार्किंगवरून वाद; वकील आणि पोलिसांना धक्काबुक्की: ३ जणांवर गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा व सत्र न्यायालय आवारात वाहन पार्किंगच्या वादातून हुज्जत घालत वकील व पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार मंगळवारी (दि. १२) उघडकीस आला.
याप्रकरणी संशयित अब्दुल लतिफ कोकणी, अन्वर हुसैन यासिन कोकणी (रा. कोकणीपुरा, भद्रकाली) व रुबिना जाबीद आबुजी (रा. भिवंडी) यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पोलिस कर्मचारी कैलास जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सकाळी ९ वाजता जिल्हा न्यायालयात प्रवेशद्वारावर कर्मचारी गंगाधर पगारे, योगेश बिडगर, वैभव पगार, तुषार डरांगे कर्तव्य बजावत असताना वरील संशयितांनी दुचाकी पार्किंग करण्याच्या कारणातून वाद घातला. कोरोनामुळे वाहनांची गर्दी करू नका, असे सांगत असताना संशयितांनी शिवीगाळ करत वाद घातला. धक्काबुक्की करत गणवेश फाडला. वाद सोडवण्यास आलेल्या ज्येष्ठ विधिज्ञांना संशयितांनी शिवीगाळ केली, अशी तक्रार सरकारवाडा पोलिस ठाण्यात दिली. संशयितांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.