कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५० हजारांची सानुग्रह मदत
मुंबई (प्रतिनिधी): कोरोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची सानुग्रह रक्कम देण्यात येईल. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात बुधवारी ही माहिती दिली. यापूर्वी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसाठीच नव्हे, तर भविष्यात या महामारीमुळे ज्यांचा कुणाचा मृत्यू होईल, त्यांच्या नातेवाइकांना ही रक्कम भरपाई म्हणून दिली जाणार असल्याचेही केंद्राने स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या आपत्ती निवारणार्थ राखीव निधीतून ही रक्कम संबंधितांना दिली जाणार आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार एनडीएमएने अशा भरपाईबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. कोरोनाचा देशात संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३.९८ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या सर्वांच्या नातेवाइकांना ही ५० हजारांची रक्कम दिली जाणार आहे.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8269,8264,8248″]
दाखल होत्या याचिका : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारांनी मदत करावी, अशी मागणी करणाऱ्या काही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या. या याचिकांमध्ये ४ लाखांपर्यंतची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होती. परंतु, या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाखांची भरपाई देणे शक्य नसल्याचे सरकारने स्पष्ट केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सरकारला यासंबंधीची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते.
काय होते आदेश?
कोरोनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाइकांना यासंबंधीची भरपाई देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने ३० जून रोजी दिले होते. शिवाय, ही भरपाई किती असावी यासंबंधी निर्णय घेऊन तसे निर्देश राज्य सरकारांना देण्यात यावेत, असेही काेर्टाने स्पष्ट केले होते.
हे तर सरकारचे कर्तव्यच:
सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने महामारीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना भरपाई म्हणून ठराविक रक्कम देणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे म्हटले होते. मात्र, ही रक्कम किती असावी, हे ठरवण्याचे अधिकार सरकारला दिले होते.