शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनची मागणी
नाशिक (प्रतिनिधी): गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याने आणि वापरात नसल्याने उंटवाडीतील जगतापनगर, कर्मयोगीनगर येथील महापालिकेच्या सभागृहांची दुरावस्था झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या इमारती अक्षरश: धूळखात पडून आहेत.
त्यांची दुरूस्ती करावी, विद्युतीकरणाचे काम करून इमारती वापरायोग्य कराव्यात. प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांनी स्वअधिकारात महिलांना हे सभागृह योगा, प्राणायाम करण्यासाठी वापरण्यास मोफत द्यावे, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनने केली आहे.
याबाबतचे निवेदन शुक्रवारी, ८ ऑक्टोबर रोजी आयुक्त कैलास जाधव यांना देण्यात आले.
प्रभाग क्रमांक २४ मध्ये कर्मयोगीनगर येथे छत्रपती राजे संभाजी व्यायामशाळा आहे, तेथील पहिल्या मजल्यावरील हॉल रिकामा आहे. कर्मयोगीनगर येथेच विठ्ठल बंगल्याजवळ सर्वे नंबर ७७३ मध्ये महापालिकेचे सभागृह आहे. उंटवाडीतील प्रभाग क्रमांक २५ मध्ये जगतापनगर येथे स्वर्गीय बाबासाहेब गाढवे सभागृह आहे. वापरात नसल्याने या सर्व इमारतींची अत्यंत दैन्यावस्था झाली आहे. सर्व खिडक्यांच्या काचा तुटल्या आहेत, विद्युत प्रवाहही खंडित झाला आहे. येथे कचर्याचे ढिग साचले असून, घाणीचे साम्राज्य आहे.
विद्युतीकरणाचे काम करावे, इतर दुरूस्ती करावी, आतील व बाहेरील परिसर स्वच्छ करावा. या इमारती वापरायोग्य कराव्यात. या इमारती सुस्थितीत असत्या तर कोरोना काळात त्यांचा वापर होवू शकला असता. कोट्यवधी रुपये किंमतीच्या महापालिकेच्या या इमारतींचे वापर नसल्याने मोठे नुकसान होत आहे. आयुक्तांनी आयुक्तपदाच्या अधिकारात या इमारतींमध्ये महिलांना योगा, प्राणायामसाठी परवानगी दिल्यास व्यायामाची सोय होण्याबरोबरच इमारतींचे रक्षण होईल, देखभाल होईल व स्वच्छताही राहील, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, धवल खैरनार, संगिता देशमुख, सुजाता काळे, मंदा बेंद्रे, वृषाली मैंद, प्रतिभा पाटील, वंदना पाटील, सुनिता पाटील, मीना टकले, मनिषा मिंधे, सिंधुबाई मिंधे, प्रमिला पाटील, मिनाक्षी पाटील, अर्चना गर्जे, उज्ज्वला सोनजे, सुशिला पाटील, सुनिता उबाळे, मीरा खैरनार, वनिता अकर्ते, पुष्पा धुळे, ज्योती वडाळकर, कांचन महाजन, ज्योत्स्ना पाटील, मनिषा शिरोडे, अलका भुसारे, स्वाती गांगुर्डे, प्रगती साळी, अनिता पाटील, दिपीता काळे, श्याम अमृतकर, मकरंद पुरेकर, संजय टकले, श्रीकांत नाईक, विनोद पोळ, अशोक पाटील, मनोज वाणी, डॉ. राजाराम चोपडे, डॉ. शशिकांत मोरे, बाळासाहेब राऊतराय, दीपक दुट्टे, पुरुषोत्तम शिरोडे, प्रथमेश पाटील, शैलेश महाजन यांच्यासह रहिवाशांनी ही मागणी केली आहे.