अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या ‘त्या’ पोलिसाला मिळाला जामीन
नाशिक (प्रतिनिधी): म्हसरुळ परिसरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या शहर पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला. सोमवारी (दि. १३) संशयिताने अल्पवयीन मुलीना फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी म्हसरुळ पोलिसांना दिली होती. संशयिताला नांदूरनाका येथे अटक करत मुलीची कारमधून सुखरूप सुटका करण्यात आली होती. संशयिताला मंगळवारी (दि. १४) न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहर पोलिस दलातील कर्मचारी संशयित दीपक जठार याच्याविरोधात मुलीचे अपहरण केल्याची तक्रार पोलिसांत प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत म्हसरुळ पोलिसांनी संशयिताचा तंत्रविशलेषण शाखेच्या मदतीने माग काढत त्याला नांदूरनाका येथे कारमध्ये अटक केली होती.
मुलीची सुखरूप सुटका करत मुलीला वडिलांच्या ताब्यात दिले होते. संशयिताच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले होते. तत्पूर्वी पीडित मुलीची पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी केली. यामध्ये मुलीसोबत कुठेही गैरकृत्य झाले नसल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. संशयिताला न्यायलयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. संशयिताच्या वकिलांनी जामीन साठी अर्ज केला न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याची माहिती तपासी अधिकारी धनश्री पाटील यांनी दिली.
निलंबनाच्या कारवाईची शक्यता:
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या पोलिसाचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तयार केला असून ताे पोलिस आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे. यावर आयुक्तांकडून संशयित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांंनी व्यक्त केली आहे.