जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून भद्रकाली परिसरात एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा असाच एक प्रकार पंचवटी पोलीस ठाण्यात देखील दाखल झाला आहे. कुणाल गायकवाड या तरुणाने आत्महत्या करत सुसाईड नोट्स मध्ये पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे…त्यामुळे नाशिकमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या कामावरच प्रश्न चिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
तेहतीस वर्षीय कुणाल गायकवाड याने गेल्या 18 फेब्रुवारीला घरात गळफास घेत आत्महत्या केली होती,आत्महत्येचं कारण अस्पष्ट असतानाच कुणालकडे एक सुसाईड नोट्स आढळून आली, ज्यात एका पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या नातेवाईकांनी आपल्याला सतत त्रास दिल्याने, आत्महत्या करत असल्याचं म्हटलं गेले आहे. सदर पोलीस कर्मचारी मयत कुणालचा साडू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, मयत कुणालच्या बायकोनेही सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. आणि त्यामुळेच आपल्याला नातेवाईक त्रास देत असल्याचे कुणालने सांगितले होते. मात्र पोलीस अधिकारी या कर्मचाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मयत कुणालच्या भावाने केला आहे.
या प्रकरणांमध्ये पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी जबाबदार आहेत की नाही, हे पुढील तपासात समोर येईलच,मात्र आत यासंदर्भात पोलीस आयुक्त काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचे ठरणार आहे !