नाशिकमध्ये अजून एक कोरोना पॉझिटिव्ह एकूण संख्या 4 वर

नाशिक: दोन दिवसांपूर्वी नाशिकमधील कठडा येथील डॉ. झाकीर रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाची कोरोना बाधित चाचणी सिद्ध झाली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये रुग्णांची संख्या एकूण चार झाली असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरूं आहेत. जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बारा झाला आहे, त्याची तिसरी चाचणीही निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे या रुग्णाला लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याचे समजते. दरम्यान काही दिवसांपूर्वी २ बाधित रुग्ण आढळून आल्याने नवश्या गणपती आणि नाशिकरोड चा काही भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे.

नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा रुग्ण सिन्नर तालुक्यातील असल्याचे समजते. हा रुग्ण दोन दिवसांपूर्वी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आरोग्य यंत्रणेने सिन्नर तालुक्यातील हा रुग्ण कुठून आला होता. कुणाकुणाच्या संपर्कात तो आला. याबाबतची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. कुटुंबियांना स्थानबद्ध केले जाणार आहे. काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कोरोना चाचणी करून घेतली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पहिलाच रुग्ण असल्यामुळे सिन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बारा होत आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही. आरोग्य यंत्रणेला सहकार्य करून चाचण्या करून घ्याव्यात. कुठल्याही प्रकारे अफवा पसरवू नयेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीनुसार या रुग्णाचे वय साधारण 65 वर्षे आहे. चाचणी सिद्ध झालेल्या रुग्णासह काही नातेवाईक मालेगाव येथे जाऊन आल्याचे समजते. यातील त्याच्या तीन कुटुंबीयांवर गुन्हा दाखल असल्याचे समजते आहे.