शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनाने निधन

नाशिक (प्रतिनिधी): शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे शनिवारी मध्यरात्रीनंतर निधन झाले. माजी महापौर विनायक पांडे यांच्या त्या वहिनी होत.

कल्पना पांडे या प्रभाग क्रमांक २४ चे प्रतिनिधीत्व करत होत्या. त्या नाशिक महापालिका निवडणुकीत चार वेळा निवडून आल्या होत्या. त्यांचे पती चंद्रकांत पांडे यांनी एकदा या प्रभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. कल्पना पांडे यांनी सिडको प्रभाग सभापती म्हणून दोन वेळा काम केले. पालिकेतील काही समित्यांवर त्यांनी काम केले.

महापालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या पांडे यांची प्रभागातील विकास कामे आणि मतदारांशी राखलेला जनसंपर्क यावर भिस्त होती. अतिशय मनमिळावू स्वभावाच्या असलेल्या कल्पना पांडे यांचे महापालिकेतील काम अतिशय आक्रमक होते. शिवसेनेला शोभेशी अशी कामाची आक्रमक शैली असल्याने महापालिकेत त्या नेहमीच चर्चेत असत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी नंदिनी (नासर्डी) नदीतील अतिक्रमणाचा मुद्यावर आवाज उठवला होता. त्यासाठी त्यांनी स्थायी समितीच्या सभागृहात, तसेच शहर अभियंत्यांच्या कार्यालयात वारंवार आंदोलनेही केली होती.