रेमडेसिवीर इंजेक्शन २५ हजाराला विक्री करणाऱ्या डॉक्टरला नाशिकमध्ये अटक

नाशिक (प्रतिनिधी): रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत १२०० रुपयांना मिळणारे हे इंजेक्शन तब्बल २५ हजार रुपयांना विक्री करणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी अमृतधाम परिसरातून अटक केली. रविवारी (दि.११) सायंकाळी अमृतधाम परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. डॉ. रवींद्र मुळूक असे या संशयित डॉक्टरचे नाव आहे.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने यासाठी रुग्णांचे नातेवाईक आंदोलन करत असतानाच काळ्या बाजारात मात्र हे इंजेक्शन उपलब्ध होत असल्याने संता प व्यक्त केला जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी पदास शासनाची मंजुरी

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि योगेश मोहिते (रा. अशोका मार्ग) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन तातडीने देण्यासाठी पंचवटीतील सद्गुरू हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवींद्र मुळीक यांच्याशी संपर्क साधला होता. हे इंजेक्शन २५ हजार रुपयांना देण्याचा व्यवहार ठरला. मुळीक यांनी मोहिते यांना अमृतधाम येथे बोलावले. इंजेक्शन विक्री करतानाच पोलिसांनी डॉ. मुळीक यांना अटक केली.

🔎 हे वाचलं का?:  SIR: प्रारूप मतदार यादी १७ ऑगस्टला, अंतिम यादी १९ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

मोहिते हे डॉ. मुळीक यांच्याकडून २५ हजार रुपयांना हे इंजेक्शन खरेदी करणार होते. मात्र, पाच हजार रुपयांची रक्कम कमी पडत असल्याने ते अमृतधामजवळील एका एटीएम सेंटरमध्ये रक्कम काढण्यास गेले. तेथे त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाच्या टोल फ्री १०० नंबरवर संपर्क साधून याबाबत तक्रार दिली. ही तक्रार पंचवटी पोलिस ठाण्याला प्राप्त होताच काही वेळात वेळात पथक घटनास्थळी पोहोचले आणि डॉक्टरला अटक करण्यात आली. संशयित डॉ. मुळीक यांनी यापूर्वी किती इंजेक्शन विक्री केले याचाही तपास पोलिस करणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम; आणखी दोन दिवस कोरड्या वातावरणाची शक्यता

हे इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयांना इंजेक्शन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असताना डॉक्टरकडूनच हे इंजेक्शन चढ्या भावाने विक्री होत असल्याने नागरिकांनी संता प व्यक्त केला आहे.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790