नाशिकमधील शहर बससेवा कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर ?

नाशिक(प्रतिनिधी): कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहर बससेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेनेच शहर बससेवा चालवावी. असा आग्रह राज्य परिवहन महामंडळाने धरला आहे. म्हणून यापुढे शहर बसेस सुरू करण्याबाबत महामंडळाला कोणताही रस नसल्याचे समजते. त्यामुळे शहर बससेवा कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील सात वर्षांपासून महामंडळाकडून महापालिकेला अनेकदा शहर बससेवा चालवण्यास नकार देण्यात आले‌ असून, अल्टिमेटमही देण्यात आले आहेत. तसेच याबाबत पत्रव्यवहारही करण्यात आले होते. सोबतच निर्वाणीचे पत्र देखील देण्यात आले आहे. मात्र, आता दोन वर्षांपासून महामंडळाने याबाबत पावले उचलत, शहरातील निम्म्यापेक्षा जास्त बसेस बंद केल्या आहेत. पूर्वी शहरात १२० बसेस सुरु होत्या. त्यानंतर त्या ४० झाल्या व सध्या कोरोनामुळे शहर बससेवाच बंद करण्यात आली आहे. एसटी महामंडळाला नाशिक विभागात बस चालवून परत शहरातही बस चालवावी लागते. त्यातही कोरोनामुळे बऱ्याच गोष्टींमध्ये बदलाव आलेला आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळ शहर बससेवेमधून बाहेर पडत असल्याचा विचार करत आहे, असे समजते. यामुळे शहर बससेवेसंदर्भात मोठे बदल होण्याची दाट शक्यता आहे. कारण कोरोना संकटामुळे महामंडळाला आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे. या दरम्यान अपेक्षित उत्पन्न नसल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; सोमेश्वर धबधब्यात पडून युवतीचा मृत्यू

आणि आज ज्या नाशिक विभागात बसेस सुरू केल्या आहेत त्यातूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. म्हणून शासनाने शहरातील बसेस सुरू करण्याचे आदेश दिले तरी, नाशिकमध्ये मात्र, रस्त्यावर वास्तवात किती बसेस धावतील हे सांगता येत नाही. त्यामुळे शहर बससेवा ही महापालिकेनेच चालवावी अशी‌ ठाम भूमिका महामंडळाकडून घेण्यात आली आहे. दुसरीकडे मात्र, महापालिकेला बस सेवेसाठी तात्काळ योग्य‌ तो निर्णय‌ घेणे गरजेचे आहे.

हे ही वाचा:  नाशिक: फोटो काढण्याच्या नादात पाय घसरून सोमेश्‍वर धबधब्यात पडल्याने युवतीचा मृत्यू