नाशिक-सुरत प्रवास करता येणार अवघ्या २ तासात !

नाशिक (प्रतिनिधी) : केंद्र सरकारकडून ग्रीन फिल्ड महामार्ग संकल्पनेतून चेन्नई-सुरत महामार्ग सहापदरीकरणाच्या सादरीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, हा ग्रीन फिल्ड महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार असल्याने नाशिक ते सुरत व नाशिक ते चेन्नई हे प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. नाशिक-सुरत दरम्यानचे अंतर १७६ किलोमीटर असेल, म्हणजे नाशिककरांना सुरतचा प्रवास केवळ २ तासात करता येणार आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

ग्रीन फिल्ड महामार्ग हा समृद्धी महामार्गाला ओलांडून जाणार आहे. त्यामुळे सुरत ते चेन्नई प्रवासाचे अंतर ८ तास तर नाशिक-सुरत प्रवास अवघ्या २ तासात करता येणार आहे. हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा-पेठ-दिंडोरी-नाशिक-निफाड-सिन्नर या ६ तालुक्यांमधून व ६९ गावांजवळून जाणार आहे. सदर महामार्ग हा सुरत-नाशिक-अहमदनगर-करमाळा-सोलापूर-कर्नल-कडप्पा-चेन्नई असा तयार करण्यात येणार आहे. तसेच हा महामार्ग सहापदरी असल्यामुळे वेळेची देखील बचत होणार आहे. या संदर्भात खासदार गोडसे यांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे बी.एस.साळुंखे, डी.आर.पाटील, श्रीनिवास राव या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, रस्ता कामासाठी १५ हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याचा अंदाज दर्शवला जात आहे.