दिंडोरी तालुक्यातील जानोरी गाव ८ दिवस बंद; ६५ जण आढळले कोरोनाबाधित !

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातलेले असतांनाच कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्यामुळे राज्य सरकारने सर्व नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. तर, दुसऱ्याबाजूला नाशिकमधील जानोरी गावातील २४ जण सायकलने पंढरपूर वारी करून परतले आहेत. दरम्यान, ते २४ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले असून, आणखी ४१ गावकर्यांनादेखील लागण झाली आहे. म्हणून, दक्षतेसाठी पुढील ८ दिवसांसाठी गाव बंद ठेवण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील जानोरी गावातील २४ जण सायकलने पंढरपूरला गेले होते. दरम्यान, दर्शन घेऊन ते परत आले असून, अनेक ठिकाणी या २४ जणांचा सत्कार देखील करण्यात आला होता. यानंतर या २४ जणांपैकी काही लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली असता, तपासणी केल्यांनतर ही २४ जण कोरोनाबाधित आढळून आली. तर, गावकऱ्यांच्या संपर्कात हि २४ जण आली होती. त्यामुळे ४१ गावकरी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामुळे जिल्हा प्रशासनाला धक्का बसला असून, खबरदारी म्हणून पुढील ८ दिवस गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. अति महत्वाचे काम असेन तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.