नाशिक (प्रतिनिधी): वाइन उद्योगामध्ये सुला वायनरीने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून यॉर्क वायनरीनेदेखील आपले स्वतंत्र ग्राहक तयार केलेले आहे. आता यॉर्क वायनरी ही सुला वायनरीमध्ये विलीन झाली आहे. असे असले तरीही यॉर्क हे नाव कायम राहणार असल्याचे रवी गुरुनानी यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यात वाइन उद्योग भरभराटीला आलेला आहे. यामध्ये सुला, यॉर्क, निफा, ग्रोवर झम्पा आदी वायनरींमुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना दिलासा मिळत आहे. वाइन पर्यटकांची संख्या वाढल्याने शहरातील पर्यटनामध्ये वाढ झाली आहे. परिणामी उलाढालदेखील वाढली आहे. सुला वायनरीपासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या याॅर्क वायनरीत टेस्टिंग रूम, रेस्टॉरंट असल्याने वाइनप्रेमींची संख्या जादा असते. गंगापूर धरणाच्या निसर्गरम्य वातावरणाचा या वायनरीमधून आनंद घेता येतो, ही बाब लक्षात घेऊन सुला वायनरीने यॉर्क वायनरी विलीन केली. या दोन्ही वायनरी एकत्रित आल्यानंतर नाशिकच्या वाइन उद्योगाला चालना मिळणार असल्याचे सुलाचे अध्यक्ष राजीव सामंत यांनी सांगितले.