नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २९ वा दीक्षान्त समारंभ येत्या २० डिसेंबरला होत आहे. विद्यापीठ प्रांगणात होत असलेल्या या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाव पडताळणी करून घेण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे केले आहे.
दीक्षान्त समारंभात डिसेंबर २०२२, मार्च २०२३ आणि मे -जून २०२३ या कालावधीत पार पडलेल्या पदविका/पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रासाठी मराठी (देवनागरी) नाव पडताळणी व दुरुस्तीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विशेष सुविधा उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज भरताना काही विद्यार्थ्यांकडून मराठी (देवनागरी) नावाच्या नोंदीत चुका होतात.
त्यामुळे मराठी (देवनागरी) नाव दुरुस्तीचे हे अभियान विद्यापीठामार्फत राबविण्यात येत आहे. उत्तीर्ण झालेल्या पदवीधरांना दीक्षान्त सोहळ्यात प्रदान केल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रासाठी आपले मराठी (देवनागरी) नाव पडताळणी आणि दुरुस्तीची सोय विद्यापीठाच्या https://29convocation.ycmou.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
त्यासाठीची २९ नोव्हेंबरपर्यंत मुदत असणार आहे. विद्यार्थ्यांनी आपले मराठी (देवनागरी) नाव तपासून त्यात काही दुरुस्ती असल्यास संकेतस्थळावरच त्यांना त्वरित दुरुस्ती करता येऊ शकेल. विद्यार्थ्यांनी नाव दुरुस्ती न केल्यास भविष्यात प्रमाणपत्रावरील नाव दुरुस्तीसाठी विद्यापीठामार्फत शुल्क आकारण्यात येईल.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी नावे तपासून आवश्यक असल्यास दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी केले आहे.